नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर्जाहिन आणि आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थ विकणाऱ्या १८ अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. नागपूर ईटारसी रेल्वे मार्गावर ही कारवाई करण्यात आली.
पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र घाण, चिखलाचे साम्राज्य असताना गलिच्छ ठिकाणी खाण्या-पिण्याचे पदार्थ तयार करण्याचा आणि ते रेल्वे गाड्यांमध्ये विकण्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये दिसून येतो. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांविरुद्ध वारंवार तक्रारी ओरड करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. मात्र, नागपूर-भोपाळ मार्गावर घडलेल्या दुषित पदार्थांमुळे रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगून त्यांनी अनधिकृत खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईची मोहिमच सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, गेल्या महिनाभरात शंभरावर वेंडरविरुद्ध कारवाई झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर, गेल्या दोन दिवसांत नागपूर ईटारसी मार्गावर रेल्वेच्या विशेष पथकाने कडक तपासणी मोहिम राबवून १८ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, पेय जप्त करण्यात आले.
कारवाई अन् दंडहीरेल्वेच्या विशेष पथकाने पकडलेल्या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अटक करून त्यांच्याकडून पदार्थ जप्त केलेच. मात्र, त्यांच्याकडून २८ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. नागपूर ते बैतुल दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते नागपूर-इटारसी, नागपूर-सेवाग्राम-बल्लारशाह आणि नागपूर-वर्धा-बडनेरा या भागात जास्त दिसतात. या विभागावर आता खास लक्ष ठेवले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संबंधाने बोलताना सांगितले.