नागपूर :रेल्वे प्रवासात ज्वलनशील पदार्थ सोबत नेणे तसेच रेल्वेगाड्यातधूम्रपान केल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना थांबविण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अभियान सुरू केले आहे. या अभियानात ३३ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ६६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रवासात ज्वलनशील साहित्य नेणे इतरांना नेऊ देणे दंडात्मक गुन्हा आहे. यात दंडात्मक कारवाईसह तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. रेल्वेगाडीत केरोसीन, सुकलेले गवत, स्टोव्ह, पेट्रोल, गॅस सिलिंडर, माचिस, फटाके अशा आग पसरविणाऱ्या वस्तू नेण्यास मनाई आहे. रेल्वेगाडीत कोणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबतच २०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. रेल्वेत आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रवाशांनी ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगू नये, असे आवाहन दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांनी केले आहे.