नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ९० लोकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करून ४१३०० रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्या प्रकरणी २९ प्रकरणांची नोंद करून ११६०० रुपयांची वसुली करण्यात आली. १० व्यक्तीवर रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा येथे कचरा टाकल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. ९ दुकानदारांवर रस्ता, फुटपाथवर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप टाकून अडवून ठेवल्या प्रकरणी ५ लोकांवर कारवाई करण्यात आली. गॅरेज व वर्कशॉप वाल्यांनी कचरा टाकल्याने प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली. रस्ता, फुटपाथवर बांधकामाचा मलबा टाकल्या प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली.
- प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्यावरही कारवाई
प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ५ लोकांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जैन समाज सांस्कृतिक भवन, रेशीमबाग यांच्यावर रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.