लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका अहवालानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू, खर्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले आहे. शिक्षण विभागाने अहवालाची गंभीरता लक्षात घेऊन, जिल्ह्यात तंबाखुमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या अभियानात शिक्षकांना टार्गेट करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तंबाखु, खर्यापासून मुक्त करायचे असेल, तर शिक्षकांनी ही व्यसने टाळल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाळेत तंबाखू, खर्रा खाणाऱ्या शिक्षकांवर या अभियानांतर्गत कारवाई होणार आहे.नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात जि. प. च्या प्राथमिक शाळा एकूण १०४९, उच्च प्राथमिक शाळा ५१५, तर माध्यमिक १६ शाळा आहेत. अनेक शिक्षक कर्तव्यावर असतानासुद्धा तंबाखू, खर्रा व इतर व्यसन करीत असतात. काही शिक्षक तर विद्यार्थ्यांनाच खर्रा व तंबाखू आणण्यास पाठवितात. जि. प. च्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात हा प्रकार अनेकदा उघडकीसही आला आहे. अनेक शिक्षकांवर कारवाईसुद्धा झाली आहे. जि. प. ने आता स्वच्छता व आरोग्य अंतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रकल्पाची सुरुवात केली आहे. तंबाखूमुक्त शाळेचे ११ निकष या सत्रामध्ये पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी तालुकानिहाय तंबाखूमुक्त अभियानाचे शाळांचे प्रस्ताव मुख्याध्यापकांमार्फत संकलित केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदेर्शानुसार शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी ८ जानेवारीला मनपाच्या डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेचे सहा. शिक्षक डॉ. राजहंस वंजारी यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. डॉ. वंजारी हे जिल्ह्यातील कोणत्याही शाळेला आकस्मिक भेट देऊन तपासणी करणार आहेत. कर्तव्यावर असताना शिक्षक व्यसन करताना आढळल्यास डॉ. वंजारी हे संबंधित शिक्षकाचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाकडून व्यसनखोर शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय डॉ. वंजारी हे स्वयंप्रेरणेने कार्यशाळा घेऊन विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांना व्यसनांचे दुष्परिणामही सांगणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा करण्यावर भरशिक्षण विभागाने जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करून जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याची जबाबदारी सोपविली आहे. शाळांना भेटी देऊन कार्यशाळा घेऊन जागृती करण्यावर भर राहील. शाळा लवकर तंबाखूमुक्त कशा करता येईल यावर भर राहणार आहे.- डॉ. राजहंस वंजारी, समन्वयक