नागपूरात काँग्रेस नेता शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिल्याचं प्रकरण खूप गाजत आहे. याप्रकरणी भाजपाने आक्रमक पवित्र घेत शेख हुसेन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसैन यांच्यावर का नाही? असा प्रश्न देखील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. पोलीसांना तीन दिवस वेळ देऊ, शेख हुसेन यांना अटक झाली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले. तसेच नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत ‘थप्पड’ शब्द वापरला तेव्हा त्यांना अटक केली. मग शेख हुसेन यांनी पंतप्रधान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अटकेची कारवाई का नाही?, नागपूर पोलीस दबावात आहे का? असा भाजप नेत्यांचा नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सवाल केला आहे. हुसेन यांच्याशिवाय ‘त्या' कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा’, ‘मंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी, राजेंद्र मुळक यांनी पंतप्रधान यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा’ याबाबत भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. नागपुरात ईडी विरोधात झालेल्या झालेल्या आंदोलनात बोलताना शेख हुसेन यांनी वक्तव्य केलं होतं. बावनकुळे यांच्यासोबत आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
घडलेल्या घटनेनंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला. नॅान बेलेबल असल्याने जामीन झाला. आता भाजपच्या निवेदनानंतर आणखी काय कलम लावता येईल याबाबत कायदेशीर कारवाई करु, शेख हुसेन यांच्याबाबत ताज बाबा ट्रस्टमधील काही गैरव्यवहाराची तक्रार आली होती. त्याबाबत माहिती घेऊ. पोलीसांवर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायद्यानुसार कारवाई करतोय असे नागपूर पोलिसांनी सांगितले.