लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.
नुकताच कृषी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. बोगस बियाण्यांवर निर्बंध घालण्यासंदर्भात सदस्यांनी बैठकीत चर्चा केली. शेतकरी कृषी केंद्रावरून बियाण्यांची खरेदी करतात. या केंद्र चालकांना काही कंपन्या आमिष दाखवून बोगस बियाण्यांची विक्री करतात. परंतु शेतकऱ्यांनी बियाणे पेरल्यानंतर ते उगवतच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. त्याचा आगाऊचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व तक्रारी टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी आणि नंतरच विक्री करावी, असे विभागाला स्पष्ट बजावले आहे.
बैठकीत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती मोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी समन्वय साधून मार्गदर्शनाची मोहीम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.
बेटारायझम बुरशी धान उत्पादक शेतकऱ्यांना पुरवावी
खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत वैद्य म्हणाले, धानपिकावर तुडतुड्याचा प्रकोप वाढून दरवर्षी धान उत्पादकाचे मोठे नुकसान होते. यंदा कृषी विद्यापीठाने बेटारायझम बुरशीची निर्मिती केली आहे. त्यामुळे तुडतुड्याचा प्रकोप नाहीसा होणार आहे. ही बेटारायझम बुरशी शेतकऱ्यांना पुरवावी. धानपिकावरील खोडकिडा टाळण्यासाठी ट्रायकोकार्ड वापरण्यासाठी जनजागृती करावी.