पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांचा इशारा नागपूर : नियम आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे सिस्टिम, पार्टीचे आयोजक आणि लॉनमालक या सर्वांविरुद्ध येणाऱ्या दिवसात पोलीस कारवाई करू शकतात, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला. शुक्रवारी जैन भवन गांधीबाग येथे पोलीस विभाग आणि विदर्भ बॅकस्टेज असोसिएशन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त (लकडगंज) रिना जनबंधू, सहायक पोलीस आयुक्त (कोतवाली) अरुण जगताप, विदर्भ बॅकस्टेज असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे आणि सचिव संदीप बारस्कर प्रामुख्याने उपस्थित होते. पार्टी आयोजित करण्याचा परवाना घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. डीजे सिस्टिमवाल्यांना लहान समजले जाते. चूक कुणाची असो प्रत्येक वेळी साऊंड सिस्टिमवाल्यांवरच पोलिसांकडून कारवाई केली जाते. मद्यप्राषन केलेली मंडळी उशिरापर्यंत डीजे वाजवण्याचा आग्रह करतात. ऐकले नाही तर सामानाची तोडफोड करतात. अशा अनेक समस्यांचा पाढा असोसिएशनच्यावतीने संदीप बारस्कर यांनी पोलीस आयुक्तांसमोर वाचून दाखवला. यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी डीजे सिस्टिम आणि पार्टीचा परवाना प्राप्त करण्यासाठी भविष्यात एक खिडकी योजना सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले. डीजे आणि पीए सिस्टिमधारकांमधील भेद मिटविण्यासाठी सर्व साऊंडवाल्यांना समान दर्जा दिला जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे, लॉनमालक आणि पार्टीचे आयोजक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या आयोजकाविरुद्ध कारवाई केली जाईल. डेसिबल मीटरबाबत माहिती देण्यासाठी डीजे चालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी संयुक्तपणे प्रशिक्षण वर्ग घेतला जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. संचालन नंदन गजेंद्रगडकर यांनी केले. अमोल मौंदेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
डीजे आणि लॉन मालकावरही होणार कारवाई
By admin | Published: January 22, 2017 2:28 AM