लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात ठिकठिकाणी छापे मारून तपास पथकाने अनधिकृत खाद्यपदार्थ तसेच पिण्याच्या बॉटल विकणाऱ्यांवर कारवाई केली. दोन दिवसांत २३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून खाण्यापिण्याच्या चिजवस्तू जप्त करण्यात आल्या.
आरोग्यास अपायकारक असलेल्या खाण्यापिण्याच्या चिजवस्तू रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाड्यांमध्ये विकल्या जाऊ नये यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधाने कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे असूनही कारवाईसाठी चालढकल होत असल्याचे पाहून अनधिकृत खाद्यपदार्थ तसेच पेय विकणारी मंडळी ठिकठिकाणची रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये आरडाओरड करतात. त्यामुळे अशांवर कारवाई करण्यासाठी मित्तल यांनी सात वेगवेगळी पथके तयार करून त्यांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, या पथकांनी नागपूर रेल्वेस्थानक, बल्लारशाह रेल्वे स्थानक तसेच नागपूर-वर्धा, नागपूर-इटारसी विभाग तसेच नागपूर-सेवाग्राम-बल्लारशा मार्गावर ठिकठिकाणी शुक्रवारपासून छापे मारले. यात नागपूर स्थानकावर १२ विक्रेते अवैधपणे खाण्यापिण्याच्या वस्तू विकताना आढळले. त्यांना अटक करण्यात आली. नागपूर-वर्धा आणि नागपूर-इटारसी मार्गावर ५ तर, बल्लारशाह स्थानकावर २ अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. नागपूर- सेवाग्राम-बल्लारशाह मार्गावर ४ जणांकडून प्रतिबंध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्सचे १० बॉक्स जप्त केले. प्रवाशांनी अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून कोणत्याही चिजवस्तू विकत घेऊ नये आणि त्यांची माहिती लगेच रेल्वेच्या पोलिस किंवा गार्डला द्यावी, असे आवाहन या संबंधाने करण्यात आले आहे.
तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये अंबूज कॅटरर्सच्या क्लस्टर किचनमध्ये कारवाई कारवाईच्या या विशेष मोहिमेतील पथकाने ट्रेन नंबर १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेसमध्येही कारवाई केली. पॅन्ट्री कारची तपासणी करून अंबूज कॅटरर्सच्या क्लस्टर किचनमध्ये अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली ७ अवजड उपकरणे जप्त करण्यात आली.