नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याची थाप मारून पालकांना लाखोंचा गंडा घालण्याचा गोरखधंदा नागपूरसह राज्यातील ठिकठिकाणी सुरू आहे. मध्यंतरी गप्प बसलेले रॅकेट पुन्हा नव्या जोमाने सक्रिय झाले आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट नागपुरातून संचालित केले जाते. पोलिसांकडे तक्रारी मिळून, गुन्हे दाखल होऊनही रॅकेटच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पाहिजे तसे प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांपासून हे रॅकेट बिनबोभाट अनेक पालकांची फसवणूक करीत आहे.
सोशल मीडियावर ‘चूज युवर करिअर’सारख्या जाहिराती टाकून किंवा प्रत्यक्ष फोन करून हे रॅकेट संबंधित पालकांना आकर्षित करतात. सर्वाधिक ॲडमिशन फी मेडिकलची (एमबीबीएस) असल्याने आपल्याशी संपर्क करणारे पालक गर्भश्रीमंत असणार याची त्यांना जाणीव असते. त्यांना शब्दच्छल करून पाल्यांच्या भविष्याचे मृगजळ दाखवत रॅकेटमधील भामटे आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतर १५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत ॲडमिशनचा खर्च येईल, प्रारंभी परराज्यात ॲडमिशन होईल, असे सांगितले जाते. नंतर आपल्याच राज्यात ॲडमिशन करून देतो, अशी थाप मारून हे भामटे मेडिकलच्या सीटची किंमत वाढवून पाच-दहा लाख रुपये जास्त उकळतात.
त्या कॉलेजमधील शीर्षस्थ आपले एकदम खास आहेत, आपल्याशिवाय ते दुसऱ्या कुणाशी आर्थिक व्यवहाराची अथवा प्रवेशाची गोष्ट करीत नसल्याचे सांगितले जाते. खूपच चिकित्सक वृत्तीचे पालक असल्यास आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करतो, असे म्हटल्यास त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात बोलवून घेतले जाते. कटकारस्थानाचा एक भाग म्हणून रॅकेटमधील सदस्य संबंधित शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये आधीच जाऊन तेथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांशी आधीच ओळख करून घेतात. छोट्या मोठ्या कामासाठी शंभर-दोनशे रुपये त्यांच्या हातात ठेवतात. त्यामुळे हा भामटा दिसताच संबंधित दोन-तीन कर्मचारी त्यांना नमस्कार करतात.
सावज म्हणून ज्या पालकांना जाळ्यात ओढले असते, ते भामट्यांना मिळणारी मानाची सलामी समजून प्रभावित होतात. नंतर आपला मुलगा-मुलगी डॉक्टर बनणार, या एकाच कल्पनेने हुरळलेल्या पालकांना पुढे काही विचार करण्याची गरजच भासत नाही आणि रॅकेटमधील भामट्याने सांगितल्याप्रमाणे रोख स्वरूपात रक्कम त्याच्या हवाली करतात.
----