लोकमत न्यूज नेटवर्कयोगेश पांडेनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रकोप वाढतच असून अनेक लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून निदर्शने, बैठकादेखील सुरू आहेत. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना इच्छा नसतानादेखील त्यात सहभागी व्हावे लागत आहे. जर नेत्यांचे बोलणे ऐकले नाही तर नाराजीची भीती आणि गर्दीमध्ये गेले तर कोरोना होण्याची धास्ती अशा दुहेरी संकटात ते अडकले आहेत. यासंदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी खुलेपणाने बोलण्याची हिंमत नसल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपूर जिल्ह्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोना झाला. यात विविध पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. मागील काही आठवड्यांच्या कालावधीत विविध मुद्यांवरुन राजकीय पक्षांकडून निदर्शने किंवा विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संदेश देण्यात येतात. परंतु जर संबंधित ठिकाणी उपस्थिती दर्शविली नाही तर वरिष्ठ पदाधिकारी नाराज होतात. राजकीय पक्षांच्या या उपक्रमांत नेहमीच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसतो. अनेक जण स्वत:चे छायाचित्र यावे यासाठी मास्कदेखील घालत नाहीत. शिवाय प्रसारमाध्यमांसमवेत नेते संवाद साधतात तेव्हा आजूबाजूला गर्दी असते. या एकूणच बाबी कोरोनाची लागण होण्यासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे गर्दीत कुठून कोरोनाची बाधा होईल याची कुठलीच शाश्वती नसते. नागपुरात राजकीय वर्तुळात वावरणाºया काही जणांनादेखील नेत्यानंतर कोरोनाची बाधा झाली असल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत आतातरी नेत्यांनी काही काळ संयम पाळावा व प्रत्यक्ष आंदोलन किंवा बैठकांचे आयोजन करू नये असा सूर असल्याची माहिती राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतजवळ बोलताना सांगितली.
‘आऊट ऑफ रिच व्हायचे कसे?’एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी पक्षाच्या विविध उपक्रमात सक्रिय होता. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे लक्षात येताच तो सावध झाला. मात्र तरीदेखील पक्षाच्या उपक्रमांना जाणे आवश्यक होते. आम्ही आऊट ऑफ रिच झालो तर वरिष्ठ पदाधिकारी व नेते नाराज होतात, अशी प्रतिक्रिया त्याने गोपनियता कायम ठेवण्याच्या अटीवर दिली.
नेत्यांनो, संयम पाळामागील काही दिवसात सर्वच पक्षांकडून काही ना काही आयोजन करण्यात आले. कधी निदर्शने तर कधी कार्यक्रमानिमित्त नेते, पदाधिकारी एकत्रित आले. शिवाय मोठ्या संख्येने एकत्रित या असे संदेशदेखील दिले जातात. एका सत्कार कार्यक्रमात तर एका मंत्र्याने फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याचे दिसून आले होते. नेत्यांकडूनच काळजी घेत नसल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा तणाव आणखी वाढतो आहे. मात्र कुणाजवळ ही बाब बोलण्याचेदेखील ते टाळत आहेत. नेत्यांनी संयम पाळला नाही तर राजकीय वर्तुळात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका आहे.