नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मुंबईसोबतच नागपुरातदेखील शिवसैनिक सरसावले. बुधवारी रात्री व्हेरायटी चौकात कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत भाजपविरोधात निदर्शने केली. मात्र यावेळी पक्षाचे शहरातील अनेक मोठे नेते, पदाधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले.
शिवसेनेतील बंडाळी उफाळून आल्यानंतर राज्यभरातून त्यासंदर्भात क्रिया-प्रतिक्रिया येत आहेत. बुधवारी उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून संवाद साधला व राजीनामा देण्याची तयारी दाखविली. त्यानंतर काही तासात त्यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडून कलानगर येथील मातोश्री या त्यांच्या खाजगी निवासस्थानाकडे प्रयाण केले. याच वेळी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ व्हेरायटी चौकात एकत्रित यावे, असे संदेश शिवसैनिकांना देण्यात आले. साडेनऊच्या सुमारास सुमारे शंभर कार्यकर्ते एकत्रित आले. यावेळी दक्षिण-उत्तर नागपुरचे शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे हे उपस्थित होते.
सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर बंडाळी करण्यात आलेल्या शिवसेना आमदारांविरोधात निदर्शने करण्याचे टाळण्यात आले व थेट भाजप नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यादेखील उपस्थित होत्या.
५४ आमदार गेले तरी उद्धव ठाकरेंसोबतच
यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन असल्याचीच भूमिका घेतली. बंडाळी करणाऱ्यांची कारणे काहीही असली तरी शिवसेना पक्ष जास्त महत्त्वाचा आहे हे त्यांना कळाले पाहिजे. ५५ पैकी ५४ आमदार निघून गेले तरी आम्ही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू, असा कार्यकर्त्यांचा सूर होता.