एकाच रात्री तीन कार फोडल्या : रोकड अन् महत्त्वाची कागदपत्रे लंपास नागपूर : बजाजनगरातील तीन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी आतमधून रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. एकाच रात्रीत झालेल्या या ‘कारफोडी’च्या घटनांमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. बजाजनगरातील बांधकाम व्यावसायिक सुदत्ता प्रमोद रामटेके (वय ४२) यांनी सोमवारी रात्री आपल्या घराजवळ मर्सिडिज कार (एमएच ३१/ईई ७७०७) पार्क करून ठेवली. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी कारच्या डाव्या भागातील खिडकीची काच फोडून आतमध्ये ठेवलेली बॅग (ज्यात ४८ हजारांची रोकड होती) लॅपटॉप आणि एलएडी टीव्ही चोरून नेला. अशाच प्रकारची दुसरी घटना श्रद्धानंदपेठमध्ये घडली. चोरट्यांनी मंगेश शामराव कडव (वय ४२) यांच्या कारची (एमएच ३१/ईए ०२२५) काच फोडून आतमधील बॅग लंपास केली. बॅगमध्ये आधारकार्ड, पासपोर्ट, चेकबुक होते. तिसरी घटना लक्ष्मीनगरात घडली. सारंग प्रकाश उपगनवाल (वय ४२) यांच्या कारची (एमएच ३१/डीव्ही १०००) काच फोडून आतमधील बॅगमध्ये असलेली कागदपत्रे चोरून नेली. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता या घटना उघडकीस आल्या. त्यानंतर तीनही कार मालकांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक के. एस. कुथे यांनी चोरीचा गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी) कारमध्ये बॅग ठेवू नका या घटनांमधून शहरात ‘कारफोडी’ करणारी टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट होते. टोळीतील चोरटे मध्यरात्रीनंतर सक्रिय होऊन घराबाहेर ठेवलेल्या कारमध्ये बॅग आहे का, ते पाहत असावेत. बॅग दिसताच तीत रोकड अथवा मौल्यवान चीजवस्तू असावी, असा अंदाज बांधून कारची काच फोडून चोरी करीत असावेत, असा पोलिसांचा तर्क आहे. कारण ज्या ठिकाणी या घटना घडल्या त्या ठिकाणी दुसऱ्या अनेक कार उभ्या होत्या. मात्र, त्यात बॅग नसल्यामुळे चोरट्यांनी त्यांना हात लावला नाही. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी कार मालकांनी बॅग कारमध्ये ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
उपराजधानीत ‘कारफोडी’ करणारी टोळी सक्रिय
By admin | Published: February 15, 2017 3:20 AM