लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटमधील हजारो कामगारांनी विविध मागण्यासाठी जोरदार नारेबाजी करीत मंगळवारी नागपूर येथील अपर कामागार आयुक्त यांच्या कार्यालयावर धडक दिली. आयुक्तांच्या कक्षात घुसून कामगारांवर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी केली.अदानी पॉवर प्लांटमधील कामगारांना कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करावे लागते. कंत्राटदारांकडून किमान वेतन दिले जात नाही. १२ ते १४ तास काम करूनही अतिरिक्त मोबदला मिळत नाही.त्यामुळे कामगार नियुक्तीमधील कंत्राट पद्धती बंद करून कामगारांना कंपनीत समावून घेण्यात यावे. गेल्या काही वर्षापासून कामगारांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याने कंत्राटदाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अदानी पॉवर प्लांट कामगार श्रमिक संघाचे अध्यक्ष व माजी आमदार हरीश मोरे यांनी अपर कामगार आयुक्त विजय पानबुडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात हरीश मोरे यांच्यासह संघटनेचे सचिव ओमप्रकाश पटले, उपाध्यक्ष सतीश तांडेकर, कार्याध्यक्ष रामविलास मस्करे, प्रवीण चौधरी, सुनील त्रिपाठी, चंद्रभान चौधरी, रफीक खान पठान, ईश्वरदयाल बावने, राजकुमार अंबुले, किरण श्रीपादराव आदींचा समावेश होता.
‘अदानी’च्या कामगारांची आयुक्त कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:32 AM