नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या अध्यक्षपदी अॅड. अतुल पांडे तर, सचिवपदी अॅड. अमोल जलतारे यांनी विजय मिळविला. असोसिएशनच्या कार्यकारीनीची निवडणूक शनिवारी पार पडली.
१६ पदांसाठी झालेल्या या निवडणूकीत ३७ उमेदवार रिंगणात उतरले होते. अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यातील अॅड. अतुल पांडे यांनी ५५४ मते घेत दमदार विजय मिळविला. अॅड. समीर सोहनी यांनी ४७६, अॅड. श्रीधर पुरोहित यांनी ४४२ तर अॅड. व्ही. जी. भांबुरकर यांनी २९ मते मिळविली. सचिवपदासाठी अॅड. अमोल जलतारे आणि अॅड. ऋग्वेद ढोरे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. यात अॅड. जलतारे ७८२ मते घेत विजयी झाले. अॅड. ढोरे यांनी ७०४ मते मिळविली. उपाध्यक्षपदी अॅड. पी. एस. तिडके आणि अॅड. एस. एन. भट्टड, कोषाध्यक्षपदी अॅड. एम. डी. लाखे, सहसचिवपदी अॅड. पी. एस. चव्हाण तर ग्रंथालय प्रभारीपदी अॅड. व्ही. एस. ओबेराय यांनी विजय मिळविला. नऊ कार्यकारी सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणूकीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. निकाल जाहीर होताच उच्च न्यायालय परिसरात विजयी उमेदवारांच्या वकिलांनी एकच जल्लोष केला.
हा सर्व मित्रांचा विजय- अॅड. पांडेमाझ्या पाठिशी उभ्या असलेल्या सर्व सहकारी आणि मित्रांचा हा विजय आहे. त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असे मत अध्यक्षपदी विजयी झालेले अॅड. अतुल पांडे यांनी व्यक्त केले. सर्व ज्युनिअर वकिलांना न्यायालयात बसण्याची व्यवस्था केली जाईल. महिला वकिलांच्या समस्या मार्गी लावू. स्टडी सर्कलचाही उपक्रम अधिक जोमाने सुरू करण्यावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले.