हायकोर्ट : अकोला समाजकार्य महाविद्यालयाला आदेशलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन विद्यार्थ्यांना भरपाई देण्यासाठी एक लाख रुपये प्रबंधक कार्यालयात जमा करण्याचा आदेश अकोला कॉलेज आॅफ जर्नालिझम मास कॉम्युनिकेशन अॅन्ड सोशल वर्कला बुधवारी दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वैशाली इंगोले व अन्य एका विद्यार्थ्याने २०१३-१४ मध्ये प्रतिवादी महाविद्यालयातील बी.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची मान्यता नव्हती. असे असताना महाविद्यालयाने या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी माहितीपत्रक छापले होते. अभ्यासक्रमाला मान्यता नसल्यामुळे विद्यापीठाने याचिकाकर्त्यांना परीक्षेत बसू दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, अमरावती विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांची अशाप्रकारे फसवणूक करीत असल्याचे आढळून आल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. महाविद्यालयाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे न्यायालयाने ही रक्कम प्रबंधक कार्यालयात जमा करण्याचा आदेश दिला. पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी २२ जून रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणात अॅड. अनुप डांगोरे न्यायालय मित्र आहेत.
विद्यार्थ्यांसाठी एक लाख जमा करा
By admin | Published: June 09, 2017 2:34 AM