दयानंद पाईकराव
नागपूर : महाविद्यालयातील अनेक तरुण दारू, ड्रग्ज, गांजा, एमडीच्या आहारी जातात. त्याचप्रमाणे समाजातील नागरिकही अशा मादक पदार्थांचे सेवन करून आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतात. अशा तरुण व नागरिकांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी ३० महाविद्यालयात पोलिसांनी युवा रुरल असोसिएशन व प्रकृती संस्थेच्या सहकार्याने ५० जणांचा ‘यंग इंडिया अनचेन्जड’ क्लब स्थापन केला आहे. या क्लबच्या माध्यमातून व्यसनाधीन तरुण आणि नागरिकांची माहिती घेऊन त्यांना व्यसनमुक्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सेवानिवृत्त सिनिअर आयपीएस अधिकारी पी. एम. नायर यांच्या नेतृत्वात ह्युमन ट्राफिकिंग रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘काउंटर ट्राफिकिंग ग्रुप’च्या माध्यमातून विदर्भातील अनेक संस्था कार्य करीत आहेत. ड्रग्जचा वापर थांबविणे, नशेच्या आहारी जाऊन मादक पदार्थांची तस्करी करणे, ह्युमन ट्राफिकिंग रोखणे या प्रमुख विषयांवर या संस्था काम करीत आहेत. यातील युवा रुरल असोसिएशन आणि प्रकृती संस्थेच्या माध्यमातून नागपूर शहर पोलिसांनी शहरातील ३० महाविद्यालयांमध्ये ‘यंग इंडिया अनचेन्जड’ हा क्लब पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२२ मध्ये स्थापन केला आहे. या क्लबमध्ये एका महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून कॉलेजमधील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यातून बाहेर काढणे, त्यांनी ठरविलेल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे, ही कामे करण्यात येत आहेत. समाजातील व्यसनाधीन व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही या संस्था आणि ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
गल्लीबोळात जाऊन पोलिस काका, पोलिसदीदी करणार मदत
व्यसनाधीन व्यक्ती, मानवी तस्करी आदींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तींना व्यसनापासून, तस्करीपासून रोखण्यासाठी परिस्थिती पाहून पोलिस काका, पोलिसदीदीचा ग्रुप मदतीला देण्यात येणार आहे. कोणाची छळवणूक होत असेल, नागरिक, महाविद्यालयीन युवक सिगारेट, ड्रग, गांजा घेत असल्यास पोलिसकाका, पोलिसदीदी पुढाकार घेऊन गल्लीबोळात जाऊन त्यांना मदत करणार आहेत.
व्यसनमुक्त समाज हेच पोलिसांचे ध्येय
‘नशेच्या आहारी जाऊन महाविद्यालयीन युवक-युवती, नागरिक आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यांना वेळीच नशेपासून दूर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यंग इंडिया अनचेन्जड या ग्रुपच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन तरुणांसोबतच समाजातील मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्या नागरिकांना नशेपासून परावृत्त करण्याचे नागपूर पोलिसांनी ठरविले आहे.’
- अश्वती दोरजे, सहपोलिस आयुक्त, नागपूर शहर
..............