लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे मंजुरी मिळालेल्या नवीन व्यावसायिक विषयांचे, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ११ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून १२ वी साठी समावेश करण्यात आला आहे. तसेच या विषयांची १२ वी ची प्रथम परीक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.हे व्यावसायिक अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन अंतर्गत फ्रेमवर्क पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ व्होकेशनल एज्युकेशन, भोपाळ यांचे मान्यताप्राप्त असल्याने शासनाने त्यास मान्यता दिलेली आहे. या योजनांतर्गत अॅग्रिकल्चरल-मायक्रो इरिगेशन टेक्नीशियन, बँकिंग फायन्शियल सर्व्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स-बिझनेस करस्पॉडंट, मीडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट-अॅनिमेशन, आणि टुरिझम अॅण्ड हॉस्पिटॅलिटी-ट्रॅव्हल्स एजन्सी असिस्टंट हे व्यावसायिक विषय मंडळातर्फे अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आले आहेत.व्यावसायिक अभ्यासक्रम ११ वी आणि १२ वी च्या नियमित वैकल्पिक विषयांतील १ विषय वगळून त्याऐवजी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील १ विषय कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येईल. किंवा जे विद्यार्थी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विषयासह ९ वी, १० वी व ११ वी उत्तीर्ण असतील अशाच विद्यार्थ्यांना १२ वी साठी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होता येईल.हा अभ्यासक्रम तसेच या विषयांचे प्रश्नपत्रिका आराखडे मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ही माहिती उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांनी संबंधित शिक्षक व विद्यार्थांच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
११ वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमात नवीन व्यावसायिक विषयांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 9:29 PM