निशांत वानखेडे
नागपूर : आपल्या अवतीभवती दिसणारी सृष्टी अनेक आश्चर्याने भरलेली आहे. अवतीभवती दिसणाऱ्या प्राण्यांखेरीज असे असंख्य प्राणी आहेत, ज्यांना आपण पाहिले नसेल किंवा कल्पनाही नसेल. केवळ भारतात आतापर्यंत ६४५३ प्रकारच्या प्राण्यांची नाेंद हाेती; पण यात आता १२६ नव्या प्रजातींची भर पडली आहे. संशाेधकांनी या नव्या प्रजातींचा शाेध लावला असून, यातील १०७ प्रजाती भारतीय आहेत. याशिवाय ३३ नव्या वनस्तींचा शाेध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
भारतीय प्राणी सर्वेक्षण आणि वनस्पती सर्वेक्षण विभागाने संशाेधित केलेला हा अहवाल केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या २०२१-२२ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. संशाेधकांनी या काळात ८३ सर्व्हे केले. यामध्ये संरक्षित क्षेत्रात २५, राज्य व केंद्रशासित प्रदेशात ११, विविध इकाेसिस्टिममध्ये ३० व इतर ठिकाणचा समावेश आहे. सर्वेक्षणादरम्यान देशभरातून १ लाख ३५ हजार २३६ नमुने गाेळा करण्यात आले. सर्वेक्षणात अतिसूक्ष्म प्राेटाेझुआ ते मानवासारख्या सस्तन प्राण्यांचा समावेश आहे. हे नवे संशाेधन सजीवसृष्टी व जैवविविधतेच्या संवर्धन व अभ्यासासाठी अतिशय लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केला.
२ सस्तन, ५ सरपटणारे नवे प्राणी
संशाेधित १२६ नव्या प्रजातींमध्ये २ सस्तन प्राण्यांचा समावेश आहे. यात एक भारतीय व एक परदेशी प्रजाती आहे. याशिवाय स्नेक प्रजातीचे ५ सरपटणारे प्राणी, १ उभयचर, ९ मत्स्य प्रजाती, १२ क्रुस्टेसी, अरक्निडा २, प्लेटिहेल्मिनथस १, साेकाेप्टेरा १, न्यूराेप्टेरा २, लेपिडाेप्टेरा ९, हेमिप्टेरा १२, एफिमेराेप्टेरा ९, थायसॅनाेप्टेरा २, ट्रायकाेप्टेरा ३, काेलिओप्टेरा १५ व हायमेनाेप्टेराच्या ४२ प्रजातींचा समावेश आहे. यातील बहुतेक प्रजातींची डिजिटल सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे.