पुरोगामी राज्यात सर्व जातींना एकत्र घेऊन आम्ही चालतो आहे. लोकांच्या भावनांचा विचार करूनच आम्ही सर्व निर्णय घेतो आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा आणि स्मृती मंदिर याचा काही संबंध नाही आणि यात कुठलेही राजकारण नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटातील काही आमदारांनी सकाळी नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे हिंदुत्व आम्ही जपत आहोत. त्या विचारावर आम्ही काम करत आहोत. हे सामान्य माणसाचे सरकार आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आल्या, त्या विकासाच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. जनतेला सरकारच्या योजनाचा लाभ व्हावा त्यांच्यामध्ये सुख समृद्धी नांदावी. समाजाच्या शेवटच्या माणसाला सगळ्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
स्मृती मंदिर परिसर हे एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. येथे कामाची ऊर्जा मिळते. त्यामुळे येथे नतमस्तक व्हायला आलो. हे सेवा करण्याचे स्थान आहे. त्यामुळे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला येथून मिळते. मला काय मिळेल? यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो? हा विचार घेऊन आम्ही येथून जात असतो, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.