लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंदच्या आजच्या पहिल्या दिवशी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. स्वत: पोलीस आयुक्त अमितेशकुमार आज सकाळपासून रात्रीपर्यंत विविध भागांत फिरून बंदोबस्ताचा आढावा घेताना दिसले.
कोरोनाचा नागपूरसह सर्वत्र झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने शनिवार आणि रविवार बंदचे नियोजन केले होते. बंददरम्यान कोणतीही गडबड, गोंधळ होऊ नये किंवा कुठेही कुणाची गैरसोय होऊ नये यादृष्टीने शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यानुसार, शनिवारी सकाळपासून शहरातील सर्व मोठ्या बाजारपेठा, संवेदनशील स्थळे, वस्त्या आणि बहुतांश मोठ्या चाैकांत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणांची स्थिती हाताळण्याची जबाबदारी त्या-त्या पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. तर, पोलीस ठाण्याकडून योग्य प्रकारे बंदोबस्त केला गेला की नाही, ते तपासण्याची तसेच बंदोबस्तावर नजर ठेवण्याची जबाबदारी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानुसार, आपापल्या भागातील गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत पोलीस अधिकारी बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर दिसत होते.
पोलीस आयुक्त रस्त्यावर
पोलीस आयुक्त अमितेशकुमार सकाळी ८ वाजतापासूनच आज रस्त्यावर निघाले. त्यांनी प्रारंभी सीताबर्डी बाजारपेठ आणि नंतर शहरातील विविध भागांत जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. बंदला गालबोट लागू नये आणि अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
शहरात रविवारी पाहुण्यांची गर्दी होणार
वेगवेगळ्या परीक्षांच्या निमित्ताने शहरात रविवारी सुमारे ९५ हजार पाहुण्यांची भर पडणार आहे. त्यांची आणि त्यांच्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नागरिकांनो, स्वत:ला जपा! - अमितेशकुमार
कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी स्वत:च आरोग्य जपावे. विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा स्वत:सोबत आपल्या कुटुंबीयांना धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.