लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या इंजेक्शनचा आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत मेयो इस्पितळात ३०० इंजेक्शन्स तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी हे इंजेक्शन नि:शुल्क पुरविण्यात येत असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर संपूर्ण नि:शुल्क उपचार करणे अपेक्षित आहे. औषधोपचारादरम्यान निधीची आवश्यकता असल्यास अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो आदी शासकीय रुग्णालयांनी निधीच्या उपलब्धतेसाठी तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येतो, असेदेखील प्रशासनातर्फे सांगण्यात आले.राज्य शासनातर्फे वैद्यकीय संस्थांना आवश्यक निधी, सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. एम्सकडून समितीला अखिल रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीकरिता, अनुदान उपलब्धतेसाठी किंवा अशा खरेदीकरिता झालेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी कुठलाही प्रस्ताव सादर झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. व्ही. पातुरकर यांनी दिली.
नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 7:54 PM
कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या इंजेक्शनचा आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध आहे.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा दावा : शासकीय रुग्णालयात रुग्णांवर नि:शुल्क औषधोपचार