आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदित्य राज कपूर. वय ६१ वर्षे. हे अनेकांना नवे असलेले नाव आहे. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना मात्र सर्वच वयोगटातील नागरिक ओळखतात. ते दिवंगत चित्रपट अभिनेता शम्मी कपूर व अभिनेत्री गीता बाली कपूर यांचे सुपुत्र आहेत. ३१० दिवसांपूर्वी ते बाईकवर जग भ्रमणासाठी निघाले. म्यानमारवरून ते कोलकाता अन् कोलकातावरून ते रायपूर मार्गाने नागपुरात पोहोचले. ‘लोकमत’शी चर्चा करताना त्यांनी प्रवासातील अनुभव सांगून जग भ्रमणाच्या आठवणी ताज्या केल्या. त्यांचे कपूर परिवारातील इतर सदस्यांप्रमाणे चित्रपट क्षेत्राशी दृढ नाते नाही. परंतु त्यांनी मिळविलेले स्थान जगभरातील युवकांसाठी दिशादर्शक आहे.लहानपणापासून जग भ्रमणाला जाण्याची त्यांची इच्छा होती. विविध देशात जाऊन तेथील नागरिक, संस्कृतीला जवळून पहावे असे त्यांना वाटत होते. केवळ १० वी पर्यंत शिक्षण घेतलेले आदित्य राज कपूर यांनी १६ व्या वर्षातच काम करणे सुरू केले होते. त्यांनी आर. के. स्टुडिओत असिस्टंट डायरेक्टरच्या रुपाने करिअरची सुरुवात केली. दरम्यान बॉबी, धरम-करम आणि सत्यम शिवम सुंदरम सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या निर्देशनात दिवंगत अभिनेता, निर्माता, निर्देशक राज कपूर यांना मदत केली. एके दिवशी भोले बाबा (कौटुंबिक गुरु) घरी आले. त्यांनी हे काम तुमच्या योग्य नसून या कामाऐवजी दुसरे काम करण्याची सूचना केली. बाबांच्या सांगण्यानुसार चित्रपट क्षेत्र सोडून व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केले. अनेक कामे केली. चित्रपट तयार केले. चित्रपट, मालिकात काम केले. जीवनाच्या प्रवासात खूप काही बदलले होते. परंतु त्यांची जग भ्रमणाची इच्छा बदलली नव्हती. ६० वर्षे वयानंतर ते जग भ्रमणाची इच्छा पूर्ण करू इच्छित होते. ही इच्छा वेगळ्या अंदाजाने पूर्ण करण्याचे ठरविले. त्यांना बाईक चालविण्याचा छंद असल्यामुळे बाईकनेच जग भ्रमण करण्याचा विचार मनात आला. इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वर्षभर संशोधन केले. त्यानंतर ज्या देशात प्रवास करायचा त्याचा नकाशा तयार केला. यात सर्वात मोठे आव्हान निसर्गाचे होते. त्याकडे पाहून प्रवास करावयाच्या देशातील हवामानाची माहिती जाणून घेतली. खर्च, साहित्याबाबत धोरण ठरविले अन् रशियापासून प्रवासाला सुरुवात केली.
प्रवासात केली नाही घाईप्रवासात आदित्य राज कपूर यांनी कधीच घाई केली नाही. ते सकाळी ६.३० वाजता उठायचे. तयार होऊन १०.३० वाजता प्रवास सुरू करायचे. सायंकाळी ६ नंतर त्यांनी कधीच बाईक चालविली नाही. निर्मनुष्य रस्त्यावर बाईक चालविताना त्यांना प्रवास संपवून घरी जावे वाटायचे. घरची आठवण येत होती. परंतु प्रत्येक नवी सकाळ त्यांना प्रवास सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा देत होती. त्यांनी प्रवासाबाबत प्रत्येक ठिकाणी कुटुंबीयांना माहिती दिली. याशिवाय वेबसाईटवरही प्रवासाची माहिती अपलोड केली.
मोठ्या शहरात गेलो नाहीआदित्य राज कपूर यांनी पार्किंगची, वाहतुकीची समस्या आणि राहण्याचा खर्च यामुळे मोठ्या शहरात जाण्याचे टाळल्याचे सांगितले. त्यांना मानव व मानवतेला पाहायचे होते. त्या देशाच्या संस्कृतीला जवळून जाणून घ्यायचे होते. जी शहरात आढळत नाही. प्रवासात स्थानिक नागरिकांची त्यांना साथ मिळाली. प्रवासात सर्वजण मदतीसाठी सरसावल्याचे त्यांनी सांगितले. प्रवास आकर्षक ठरला असून त्याच्या आठवणी डायरीत लिहून ठेवल्या आहेत. रशियात एका धाब्यावर भारतीय पदार्थाची आठवण आदी आठवणी त्यांनी संग्रहित करून ठेवल्या आहेत. त्यांना भाषेच्या समस्याचा सामना करावा लागला. त्यांनी काही देशातील शब्द वाचले होते. त्या प्रयत्नात त्यांना रशियन भाषा आली.