नागपूर : शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा करीत असलेले युवा सेनेचे प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शनिवार, २७ ऑगस्ट रोजी नागपुरात येत आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक कापसे यांनी नवीन सुभेदार येथे आयोजित केलेल्या तान्हा पोळा कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेनेला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. जाहीर सभा घेऊन ते बंडखोरांवर प्रहार करीत असून, शिवसैनिकांना साद घालत आहेत. नागपुरात ते अमर शहीद विजय कापसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाग मंदिर, नवीन सुभेदार येथे सायंकाळी चार वाजता आयोजित तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे यांची या दिवशी नागपुरात सभा किंवा रोड शो आयोजित करता येईल का, यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू आहे.
रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. आशीष जयस्वाल यांच्यासह जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार यांनी शिंदे गटाचा मार्ग धरला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे नागपूर दौऱ्यात काय बोलतात, त्यांच्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.