नागपूर : नागपूरकरांना अजनी वन वाचवायचे आहे. त्यांचा तेथे होत असलेल्या स्टेशनला विरोध नाही. त्यांना केवळ तेथील जंगल वाचवायचे आहे. त्यामुळे अजनी वन वाचवण्यासाठी स्थानिकांना भेटून व पर्यावरण जपून तेथे शासन विकास काय करता येईल, असा काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्रीआदित्य ठाकरे यांनी येथे दिला.
ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. रविवारी दुपारी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजनी वनाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अजनी वनासंदर्भात मला जी काही माहिती मिळाली आहे, त्यावरून असे लक्षा येते की, स्थानिक नागरिकांचा अजनी येथे होत असलेल्या स्टेशनला विराेध नाही. त्यांना केवळ तेथील अजनी वन हे जंगल वाचवायचे आहे. त्यामुळे पर्यावरण जपून तेथे काही होत असेल तर ते पाहिले जाईल. त्यासंदर्भात स्थानिकांशी भेटून चर्चा करू असे त्यांनी स्पष्ट केले.
आज नांदगावला देणार भेट, जिल्ह्यातील पर्यटन विषयावर करणार चर्चा
कोराडी वीज स्टेशनमधील राख नांदगाव येथील तलावात थेट साेडली जात होती, ती बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आपण राखेची तात्पुरती व्यवस्था झाली असली तरी कायमस्वरूपी व्यवस्था केली जाईल. आपण स्वत: नांदगावला सोमवारी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करू. सकाळी नांदगावला भेट दिल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात ते नागपूर जिल्ह्यातील पर्यटनविषयक बैठकीत सहभागी होतील. नागपूर विभागातील माझी वसुंधरा अभियानाचा आढावाही घेतील. त्यानंतर सायंकाळी नागपूर उड्डाण क्लबचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाईल.