लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यूदर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रशंसा केली.आदित्य ठाकरे यांनी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. ठाकरे म्हणाले, तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नाविन्यपूर्ण उपाय करून कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी कॉटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली. आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉटॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिल्या जात आहे. महापालिकानी घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनीतीवर जास्त भर दिला पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.मुंढे यांनी नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाशी लढण्यासाठी शासनाच्या दिशानिर्देशानुसार महापालिकेने कोरोना वार रुम’मध्ये तज्ज्ञांशी दररोज चर्चा करुन नवनवीन उपाययोजनांचा शोध घेतला. वेळ वाया न घालवता या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोविड-१९ चा प्रसार प्रभावीपणे रोखला. महापालिकेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या ५०० पर्यंत नेली आणि खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड-१९ च्या रुग्णांसाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.
केंद्र शासनाच्या पथकानेसुध्दा नागपूर महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मनपाच्या माध्यमाने घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली. कोरोना कंट्रोल रुमच्या माध्यमाने रुग्णांची माहिती मिळवण्यात मदत झाली. लॉकडाऊन काळात १२००० नागरिकांचे मानसिक समुपदेशन करण्यात आल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट अॅम्ब्युलन्स) देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.