नागपूर - युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी युतीच्या प्रश्नाला बगल देताना, तो प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच सोडवतील असे म्हटलं आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत नागपूरमधील शिवसेना-भाजपाच्या जागावाटपासंदर्भात आदित्य यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, पक्षाच्या दोन्ही नेत्यांपुढे बोलायला मी अगदी छोटा आहे. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री मिळून घेतील, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या आदित्य संवाद या कार्यक्रमात नागपूर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तरे दिली. सत्तेत असू किंवा नसू जनतेचं प्रश्न आम्ही सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
शिवसेना विश्वास तोडणार नाही, आमची युती ही सत्तेसाठी नसून कुणाच्या किती जागा, कुणाच्या किती सीट्स यासाठी नाही. आमची युती ही हिंदुत्वासाठी आहे. राम मंदिर, शेतकरी आणि विकासाच्या मुद्द्यांवर ही युती झाली आहे. त्यामुळे सत्तेपेक्षा या मुद्द्यांवर आमची युती असल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी युतीवरील प्रश्नाला बगल दिली. सरकारमध्ये असलो तरी, काही आवाज सरकारपर्यंत पोहोचवायला आंदोलनं करावेच लागतात. त्यामुळे पीकवीमा संदर्भातील आंदोलन हे सरकारपर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी असल्याचं आदित्य यांनी म्हटले. दरम्यान, अद्याप अनेक प्रश्न आहेत, तरुणाई प्रश्न विचारायला घाबरत नाही, हे मला दिसून येतंय. आता, नवीन महाराष्ट्र घडवायचाय, असे म्हणत आदित्य यांनी पत्रकार परिषदेची सांगता केली.