नागपूर : ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत नव्हे तोच नेत्यांकडून आपापल्या पक्षाचा विजय झाल्याचे म्हणत आमचाच पक्ष श्रेष्ठ असे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणी खोके वाटतंय तर कुणी पेढे असा खोचक टोला लगावला. यासोबतच विद्यमान सरकार केवळ ४० गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.
सीमावादावर राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री या मुद्यावर आक्रमक असताना दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलायलादेखील तयार नाही, असे पहिल्यांदाच होत आहे. जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटायला हवा तो रस्त्यावर मांडण्यात येत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
खोटारडे सरकार सरपंचपदाचीही खोटी आकडेवारी देताहेत - नाना पटोलेंची टीका
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
राज्यातील जनता आमच्या पाठिशी
'आजचा निकाल म्हणजे, गेल्या सहा महिन्यांच्या आमच्या कारभारावर ग्रामीण जनतेने दिलेली आम्हाला पसंती आहे. यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, शिंदे सरकार ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभे राहिल आणि त्यांच्या इच्छा पुर्ण करेल,' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"