नागपूर : जिल्हा परिषदेने १६ एप्रिल रोजी एक पत्र काढून अतिरिक्त शिक्षकांच्या रिक्त पदावर समायोजन करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. परंतु, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या १८ मे २०११ च्या शासननिर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत नागपूर जिल्हा परिषदेत ११ शिक्षण विस्तार अधिकारी, १०३ केंद्रप्रमुख, ३८ उच्चश्रेणी मुख्याध्यापक व १०२ पदवीधर विषय शिक्षकांची पदे बरेच दिवसापासून रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेने ही पदे पदोन्नतीने भरण्याकडे लक्ष दिले नाही. १८ मे २०११ च्या शासननिर्णयानुसार समायोजन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक ही रिक्त पदे पदोन्नतीने शिक्षकांमधून भरणे आवश्यक होते. परंतु, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रिक्त पदावर पदोन्नती न करता समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे. याला शिक्षकांमधून विरोध होत आहे. त्यामुळे समायोजनाची कार्यवाही करण्यापूर्वी रिक्त पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे, वीरेंद्र वाघमारे, गोपालराव चरडे, रामू गोतमारे, सुनील पेटकर, सुभाष गायधने, ज्ञानेश्वर वंजारी, आनंद गिरडकर, गजेंद्र कोल्हे, अशोक बावनकुळे, पंजाब राठोड, लोकेश सूर्यवंशी, दिलीप जिभकाटे, अशोक डोंगरे, उज्ज्वल रोकडे आदींनी केली आहे.