नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, प्रशासनही अधिक अलर्ट झाले आहे. ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, मनुष्यबळ आदी सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयो, मेडिकल, दत्ता मेघे, एम्स, लता मंगेशकर आदी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे सर्व सदस्य तसेच महसूल, उद्योग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेडची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीमधून १२७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून कोविड रुग्णांसाठी तात्काळ आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.
ज्या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी प्राधान्याने बेड उपलब्ध होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे अतिरिक्त ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच ऑक्सिजन प्लांट याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध विभागाचे अधिकारी व टास्क फोर्सचे अधिकारी यांनी भेट देऊन हे काम तात्काळ पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर
- कोविड रुग्णांसाठी आमदार निवास, पाचपावली तसेच वनामती येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत असून, यापैकी वनामती येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोविड सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करावी तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहील, यादृष्टीने नियोजन करावे. रेमिडेसिवीर हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपलब्ध होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
कोविड केअर सेंटर तसेच मेयो व मेडिकल येथे अतिरिक्त आरोग्य सुविधा निर्माण करून बेडसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण करून रुग्णांसाठी अतिरिक्त बेड तात्काळ उपलब्ध करण्याबाबतही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना सूचना दिल्यात.
- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी
कोविडसंदर्भात नागपूर महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषधपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा वाढविण्यात येत आहेत.
राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त