पूर्व विदर्भ : नगरपालिका अधिकाऱ्यांची बैठकनागपूर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू केल्यानंतर भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्र सरकारनेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या संचालक मीता लोचन यांनी शनिवारी पूर्व विदर्भातील नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक घेऊन त्यांना नागरी सुविधांसोबतच शहर स्वच्छतेवरही भर देण्यास सांगितले आहे.या बैठकीत मीता लोचन यांनी स्वच्छ भारत मोहिमेचा आढावा घेतला. १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधीसाठी नगरपालिका प्रशासनाने त्यांच्या विकास कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या. स्वच्छता मोहिमेवर त्यांचा अधिक भर होता. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेतानाच पालिका प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन करावे, ओला आणि कोरडा कचरा उचलण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी, वॉर्ड स्वच्छ होतो किंवा नाही याची नागरिकांकडून माहिती घ्यावी, त्यासाठी वेळापत्रक तयार करावे,जीपीएस पद्धतीचा अवलंब करावा, असे त्या म्हणाल्या.प्लास्टिकचा वापर अधिकनगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांचा वापर अधिक प्रमाणात होणे हे चिंताजनक आहे. तो टाळण्यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, प्लास्टिक ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या पुरवता येतील काय याचाही विचार करावा,असे श्रीमती लोचन यावेळी म्हणाल्या.बैठकीला विभागीय आयुक्त अनुपकुमार, उपायुक्त (सामान्य प्रशासन) आप्पासाहेब धुळाज व सर्व जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुख तसेच नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शहर स्वच्छतेबाबत आता प्रशासनही आग्रही
By admin | Published: November 16, 2014 12:45 AM