कोंढाळी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आवश्यक उपाययोजना नसल्याने अनेक रुग्णांचा उपचारांअभावी मृत्यू झाला. त्यामुळे किमान तिसरी लाट आल्यास ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व अभियंताच्या पथकाने कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचे निरीक्षण केले. काही दिवसांपूर्वी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या आढावा बैठकीत काटोलचे आ. अनिल देशमुख यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी कोंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अर्धवट कामाकडे लक्ष वेधले होते. यानुसार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. टिकेट बिसेन, डॉ. दर्शन वाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बांधवकर, काटोलच्या उपविभागीय अभियंता अश्विनी येडचितवार, शाखा अभियंता सेलोकार यांनी नुकतेच कोंढाळी येथे भेट देत ग्रामीण रुग्णालयालाच्या कामाची पाहणी केली. कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, संजय राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोरे यांच्या उपस्थितीत या पथकाने ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची विस्तृत पाहणी केली. पाच कोटी रुपये खर्च करून कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिली. या रुग्णालयाची क्षमता १०० बेडपर्यंत वाढविणे शक्य असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या ग्रामीण रुग्णालयाचे फ्लोरिंग, ईलेक्ट्रिक वायरिंग फिटिंग, दरवाजे, खिडक्या व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान, आदींचे काम निधी उपलब्ध झाल्यास दोन-तीन महिन्यांत करणे शक्य असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:09 AM