आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु प्रशासन स्तरावर मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. नागपूर विभागाचाच विचार केला तर आतापर्यंत केवळ नागपूर व वर्धा जिल्ह्यानेच जातिवाचक नावे बदलण्यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. उर्वरित भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र राज्यात अजूनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावांना, वस्त्यांना, रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही भूषणावह बाब नाही. त्यामुळे ही नावे बदलवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे ११ डिसेंबर २०२० राेजी शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आला. ९ महिने उलटत आले तरी यासंदर्भात कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम यासंदर्भातील महत्त्वाची बैठक घेतली आणि विभागातील सर्व जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांना त्यांच्या-त्यांच्या क्षेेत्रातील जातिवाचक गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची नावे बदलवण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही करवाई पूर्ण करण्याचे आणि यासंदर्भातील अहवाल सामाजिक न्याय विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही बजावले.
बॉक्स
- नागपूर जिल्ह्यातील ६१ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली.
आतापर्यंत केवळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यानेच जातिवाचक गावांची नावे बदलण्याची कारवाई केली असून तसा अहवालसुद्धा सादर केला आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ६१ जातिवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. नागपूर महापालिकेचा अहवाल अद्याप सादर व्हायचा आहे. सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांनी सुद्धा अद्याप अहवाल सादर केलेला नाही. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही कारवाई पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
- महापुरुषांची नावे द्यायची आहेत
राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जातिवाचक गावांची नवे बदलून त्याऐवजी महापुरुषांची नवे द्यायची आहेत, असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. ज्योतिबा फुले, रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, समता, सिद्धार्थ अशी नावे द्यावयाची आहेत.