नागपूर : जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलोप्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु स्वस्त डाळ विकत घेण्याबाबत लोकांमध्येच उदासिनता दिसून येत आहे. स्वस्त तूर डाळ मिळत असल्याबाबत लोकच अनभिज्ञ आहेत की काय? असा प्रश्न पडला आहे.मुंबईत जप्त करण्यात आलेली ही तूर डाळ नागपूर शहरातील २४ तर ग्रामीण भागात पाच दुकानांमध्ये १०० रुपये किलो याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. रविवारी पहिला दिवस होता. तेव्हा काही दुकाने बंद होती. तर काहींनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकारही दिसून आले. परंतु सोमवारी ही डाळ सांगितलेल्या सर्वच दुकानांमध्ये उपलब्ध होती. १, २, ३ आणि ५ किलोप्रमाणे ही डाळ लोक घेत आहेत. परंतु डाळ विकत घेण्यामध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. एक दोन लोकच डाळ विकत घेण्यासाठी येत होते. काही दुकानदारांशी चर्चा केली तेव्हा स्वस्त डाळ विकत मिळत असल्याबाबत लोकांना अजूनही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने याबाबत प्रचार-प्रसार करावयास हवा होता, असेही काहींचे म्हणणे होते.
प्रशासनाची डाळ शिजेना !
By admin | Published: May 17, 2016 2:06 AM