लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : गेल्या १३ महिन्यांपासून कुही नागरपंचायतीचा कारभार ‘प्रभारी’भराेसे असून, या ठिकाणी पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुसरीकडे नगरपंचायतीमधील इतर काही अधिकारी प्रभारीवर असल्याने, शहरातील विकासकामांसह कार्यालयीन कामकाज प्रभावित हाेत आहे. त्यामुळे कुही येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळणार तरी कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
तत्कालीन मुख्याधिकारी सुचिता पानसरे यांची ११ ऑगस्ट, २०२०ला बदली झाली. तेव्हापासून या नगरपंचायतीचा कारभार प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. गेल्या वर्षभरापासून कुही नगरपंचायतीचा कारभार एकापाठाेपाठ चार अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदावर देण्यात आला. सुरुवातीला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सुवर्णा दखणे, त्यानंतर काही दिवसांकरिता तहसीलदार बाबाराव तिनघसे, त्यानंतर पुन्हा सुवर्णा दखणे यांच्याकडेच प्रभार साेपविला गेला. मात्र, दखणे यांच्याकडे भिवापूरसह उमरेड नगरपरिषदेची जबाबदारी असल्याने, त्यांच्याकडून कुहीचा प्रभार काढून घेत, माैदा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी काेमल कराळे यांच्याकडे कुही नगरपंचायतीचा प्रभार देण्यात आला आहे. प्रभारी मुख्याधिकारी असल्याने, त्या कुही येथे फार कमी वेळ देत असून, यामुळे बरेच विकास कामे प्रभावित झाली आहेत, शिवाय अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. साेबतच काेराेना काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे कर निर्धारण अधिकारी सुहास मिसाळ यांची नुकतीच बदली झाली. त्यामुळे कर विभागही प्रभारीवरच आला आहे.
शहरातील प्रमुख समस्या असलेल्या पाणीपुरवठासह स्वच्छता विभाग तर नगरपंचायतीच्या स्थापनेपासूनच प्रभारी पदावर चालविला जात आहे. अद्यापही स्थायी स्वच्छता व पाणीपुुरवठा अभियंता या नगरपंचायतीला लाभलेला नाही. त्यातही या विभागाची जबाबदारी असलेले प्रभारी अभियंता नीलेश नरपाचे हे सुट्टीवर असल्याने दाेन्ही विभाग प्रभावित झाले असून, शहरात अस्वच्छतेने घर केले आहे.
काेराेना काळात नगरपंचायतीच्या बहुतेक विभागाचे काम कार्यालयीन अधीक्षक देवाजी सडमेक सांभाळत आहेत. काेराेनाच्या दाेन्ही लाटेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसताना शहराची जबाबदारी सांभाळण्यात, काेराेना नियंत्रित ठेवण्यात सडमेक यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. एकूणच प्रभारीभराेसे असलेल्या या नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांसह इतर विभागात स्थायी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.