आनंद डेकाटे, नागपूर : मतदान वाढवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या होत्या. सखी महिला केंद्रसह तृतीयपंथयांसाठी सुद्धा एक विशेष केदं३ स्थापन करण्यात आले होते. याला रेनबो (इंद्रधनुष्य) असे नावही देण्यात आले होते. तृतीयपंथीयांचे १०० टक्के मतदान करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. पाचपावलीतील सिंधू महाविद्यालयात ‘मिशन रेनबो’ निवडणुकीची थीम तयार करून केंद्र प्रशासनाने सजवले. परंतु, शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत २७५ पैकी केवळ ५८ तृतियपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मिशन रेनबो फेल झाल्याचे चित्र आहे.
लोकशाहीतील एक महत्वाचा उत्सव व नागरिक म्हणून आपल्या उत्तरदायित्वाची परीक्षा घेणाऱ्या नागपूर आणि रामटेक निवडणुकीसाठीचे मतदान शुक्रवारी शांततेत पार पडले. जिल्हा प्रशासनामार्फत शहरात अनेक वैविध्यपूर्ण कल्पनांना अनुसरून महिला, युवा, दिव्यांग मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी काही मतदान केंद्र साकारली होती. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या उत्कृष्ट थिम असणारे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यात बांबू थीमवर आधारित आदिवासी प्रेरित मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. कट्टा, तालुका रामटेक येथे हे केंद्र होते. कट्टा आणि पंढराई ही दोन गावे मिळून या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांसाठी विशेषत्वाने इंद्रधनुष थिम मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतरही तृतीयपंथीय मतदारांना मतदानापर्यंत पोहोचविण्यात अपयश आले. नागपूर लोकसभा मतदार संघात २२३ तृतियपंथी मतदार होते. त्यापैकी ३२ तृतियपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. तर रामटेक लोकसभा मतदार संघात ५२ तृतियपंथीयांपैकी ६ तृतियपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला.