-रिअॅलिटी चेक
नागपूर : काेराेना आता गेला, म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच, या जीवघेण्या आजाराने या महिन्यात पुन्हा डाेके वर काढले आहे. काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे संकट आणखी वाढत आहे. मुख्यमंत्री व प्रशासनाने लॉकडाऊनचा अल्टिमेटम दिला असतानादेखील रेस्टाॅरंट व्यावसायिकांनी तर नियम धाब्यावर बसविण्याचा जणू चंगच बांधला की काय, असे दिसून येत आहे. रविवारी शहरातील काही रेस्टॉरेन्टस व हॉटेल्समध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाच्या नियमावलीचे अनेक ठिकाणी पालनच होत नव्हते. ‘लोकमत’ चमूने शहरातील काही हॉटेल्सची ‘रिअॅलिटी चेक’ केली असता, हे धक्कादायक वास्तव सामोर आले.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरात ६००च्या वर रुग्णांची भर पडत आहे. अशा वेळी ही हाॅटेल्स संसर्गाचे हाॅटस्पाॅट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. हॉटेलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन होत तर नाहीच, पण मास्कचा वापर करण्याची चिंता कुणाला नाही. दाेन टेबलमधले अंतर घटले. ताप माेजण्याचे यंत्र कुठेच नाही. सॅनिटायझरदेखील बऱ्याच ठिकाणी नसल्याचे चित्र होते. अनेक रेस्टॉरेन्ट्समध्ये तर ५० टक्के उपस्थितीची अट पाळण्यात येत नव्हती. अगदी आजुबाजूला टेबल लावून ग्राहकांना बसविण्यात येत होते.
सेंट्रल बाजार रोड
सेंट्रल बाजार रोडवरील ‘चटोरी स्ट्रिट’वर सायंकाळ होताच ग्राहकांची मोठी गर्दी उसळते, परंतु येथेही कोरोनाचा प्रतिबंधक नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. रस्त्याच्या फुटपाथवरच टेबल्स खुर्च्या लागतात.
महाल
बडकस चाैक, महाल येथील राम भंडारमध्ये दिवसभर गर्दी होती व शारीरिक अंतर पाळताना कुणी दिसले नाही. मास्कचे फार गांभीर्यही दिसले नाही. काही कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने मास्क लावला नव्हता.
प्रतापनगर
श्रद्धानंदपेठ ते माटे चाैक राेडवर एका बाजूला केएफसी व दुसऱ्या बाजूला असलेल्या डॉमिनाेजमध्ये नियमांची ऐसीतैसी झाल्याचे दिसले. सॅनिटायझर आहे, पण देणे बंधनकारक नाही. आतमध्ये टेबलचे अंतर कमीच आहे, पण शारीरिक अंतर पाळले जात नाहीच नाही, असे चित्र होते. प्रतापनगर सिमेंट राेडवर असलेल्या उत्तर-दक्षिण हाॅटेलमध्येही अवस्था तशीच होती. तेथे तर सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती व फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे सौजन्यदेखील घेतले नव्हते.
बजाजनगर
कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या हॉटेल्समध्येदेखील गर्दी होती. कॉमन ग्राऊंंड नावाच्या कॅफेमध्ये शनिवारी दुपारी तर अनेक तरुण-तरुणींची गर्दी होती. फ्रुटेलाे व बगेलाे या दुकानावर रविवारी सायंकाळी तरुणांची गर्दी होती व शारीरिक अंतर तर नावालाही दिसले नाही
गांधीसागर तलाव
गांधीसागर तलावाजवळील जगदीश सावजीमध्ये दोन टेबलमधील अंतर एक फुटाचेही नसल्याचे आढळून आले आणि एका टेबलवर दाेनपेक्षा अधिक ग्राहक बसल्याचे दिसले.
- हॉटेल्स संदभार्तील काही नियम
:: अंतर राखले जाईल, यासाठी ठरावीक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही.
:: दोन टेबलमध्ये कमीतकमी २ ते ३ फुटांचे अंतर आवश्यक.
:: टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे.
:: हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणे बंधनकारक.