सावनेर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल सध्या संभ्रम आहे. अशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास सावनेर तालुक्यातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालय सुद्धा या लाटेचा सामना करण्यास सर्वोतोपरी समर्थ असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सावनेर शाखेचे माजी अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात विचारविमर्श करण्यासंदर्भात सावनेर तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तीत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे शहरातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. डॉ. धोटे म्हणाले, आता तिसरी लाट येण्याची शक्यता ३० टक्के आहे. आलीच तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स सहकार्य करतील. यावर उपाययोजना म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर येथील कोविड सेंटरप्रमाणेच बालकांसाठी कोविड सेंटर स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. सावनेर शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. निलेश कुंभारी यांनी सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यास तयारी दर्शविली. काही पालक किंबहुना बालक आर्थिक अडचणीमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास तयार नसतात अशावेळी सरकारी रुग्णालयाचा आधार मिळणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. बैठकीला तहसीलदार सतीश मासाळ, शासकीय रुग्णालयाचे प्रपाठक डॉ. पवन मेश्राम, इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश कुंभारे, डॉ. आशिष चांडक, डॉ. संदीप गुजर, डॉ. भूषण शेंबेकर, छत्रपती मानापुरे, डॉ. अनुप जैस्वाल, डॉ. निनावे आदी उपस्थित होते.