लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडचे आरोग्य सांभाळणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेंडंटची मोठ्या संख्येत पदे रिक्त असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. विशेष म्हणजे, नेत्ररोगाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना वेदना सहन करीत नातेवाईकांचा आधार घेत तळमजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डात चालत जावे लागते. वृद्ध, अपंगांना घेऊन जाण्यासाठी साधे स्ट्रेचरही उपलब्ध करून दिले जात नसल्याने रुग्णांना उचलून नेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ एवढेच अटेंडंटची भूमिका महत्त्वाची असते.रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभाग किंवा शस्त्रक्रियागृहात पोहचविण्यासाठी अटेंडंटची कामगिरी मोलाची ठरते. मात्र, मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नोंद असलेल्या मेडिकलमध्ये अटेंडंटची तब्बल ३७२ पदे रिक्त आहेत. जे आहेत त्यातील फार कमी जण जागेवर उपलब्ध राहत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर स्ट्रेचरपासून ते आॅक्सिजन सिलिंडर ओढण्याची वेळ येते. ही बिकट वेळ निभावून नेताना दमछाक होते. अनेक वेळा रुग्णाच्या जीवावरही बेतते. असे असले तरी शासनाने अद्यापही यावर तोडगा काढलेला नसल्याने मेडिकल प्रशासनही अडचणीत आले आहे. पूर्वी मेडिकलमध्ये २६ वॉर्ड होते. रुग्णांची संख्या मर्यादित होती. विभागही फार कमी होते. सध्या वॉर्डाची संख्या ४८ झाली आहे, तर खाटांची संख्या १५०० वर पोहचली आहे. विविध विभागातही वाढ झाली आहे. परंतु गेल्या ६४ वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पदात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतलेला नाही. सद्यस्थितीत मेडिकलमध्ये अटेंडंटची ५५६ पदे मंजूर आहेत, मात्र यातील केवळ १८४ पदे भरली आहेत. यांची वॉर्डासह बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृहातही ड्युटी लावली जात असल्याने वॉर्डात एक अटेंडंट देणेही रुग्णालय प्रशासनाला अडचणीचे जात आहे. यातच ६० टक्के अटेंडंटचे वय ५० च्यावर आहे. त्यांच्याकडून धावपळीचे कामे होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनाच आलेली वेळ निभावून न्यावी लागत आहे.
रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी पदभरती आवश्यकचमेडिकलमध्ये रुग्ण व विभागाची संख्या वाढत चालली आहे. परंतु त्या तुलनेत अटेन्डंट व सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. शासन आऊटसोर्सिंग करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहे. परंतु ‘आऊटसोर्सिंग’ भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. त्यांना रुग्णालयात कामाची सवय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्यापासून ते इतरही कामे करावी लागत असल्याचे वास्तव. रुग्णसेवा सुरळीत चालण्यासाठी शासनाने पदभरती करणे आवश्यक आहे.-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालयव आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (इंटक)