नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीची अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली. यात १४,२४५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, पहिल्याच दिवशी २,७६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. सर्वाधिक १,३४७ प्रवेश विज्ञान शाखेचे झाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीची सीईटी रद्द करून सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीत होणाऱ्या अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीने प्रक्रिया सुरू केली. शुक्रवारी प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. शहरातील २१७ ज्युनि. कॉलेजमध्ये अकरावीच्या ५८,७९५ जागा आहेत. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत २६,१७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २३,०७४ विद्यार्थ्यांनी भाग १ भरला असून, १८,९८४ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरलेले आहे. शुक्रवारी लागलेल्या यादीत १४,२४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आणि पहिल्याच दिवशी २,७६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
- शाखेनिहाय निश्चित झालेले प्रवेश
शाखा कॅप राऊंड मॅनेजमेंट कोटा
आर्ट २६२ १०९
कॉमर्स ६५४ १४३
सायन्स ११५० १९७
एमसीव्हीसी २१८ ३३
एकूण २२८४ ४८२
- नामांकित महाविद्यालयांमधील कटऑफ
डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील कटऑफ ४६६ गुणांचा राहिला, तर शिवाजी सायन्समध्ये ४६१ कटऑफ होता. अनुसूचित जाती प्रवर्गात कटऑफ आंबेडकरमध्ये ४५४ व शिवाजीमध्ये ४३६ राहिला. ओबीसी प्रवर्गात आंबेडकरमध्ये ४१६ व शिवाजीमध्ये ४०९ गुणांचा कटऑफ राहिला. वाणिज्य शाखेतसुद्धा आंबेडकर कॉलेजचा खुल्या प्रवर्गात कटऑफ ४५७, ओबीसी व अनुसूचित जातीचा ४११ राहिला.