नागपूर : कोरोनाचा संसर्ग व शासनाच्या आदेशानुसार यंदा दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यासह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु लोक आग्रहास्तव दीक्षाभूमी स्तुपातील दर्शन चालू राहील. ज्यांनी कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे दोन डोस घेतले असेल त्यांनाच दीक्षाभूमीत प्रवेश मिळेल. तसेच ६५ वर्षावरील ज्येष्ठांना व १८ वर्षाखालील बालकांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. (Admission to Deekshabhoomi in Nagpur only if two doses are taken)
डॉ. फुलझेले यांनी सांगितले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार नाही. परंतु १४ तारखेला सकाळी ९ वाजता निवडक भिक्खू संघाच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण केले जाईल. तसेच १५ तारखेला अशोक विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ वाजता भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना मानवंदना दिली जाईल. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाईल. दीक्षाभूमीत १८ वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील नागरिकांना प्रवेश बंद राहील. कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाईल. मास्क घालणे, शारीरिक दूर पाळणे बंधनकारक राहील. कुठल्याही प्रकारचे अन्नदान करता येणार नाही. दीक्षाभूमी परिसरात दुकानांना बंदी राहील. स्मारकात जाण्यासाठी एकच रांग राहील. त्यामुळे दर्शनासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पत्रपरिषदेला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य एन.आर. सुटे आणि विलास गजघाटे उपस्थित होते.
हे लक्षात असू द्या
- दोन डोस घेतलेल्यांनाच तपासणीअंती प्रवेश
- ६५ वर्षावरील ज्येष्ठांना, १८ वर्षाखालील बालकांना प्रवेश नाही
- आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी न येण्याचे आवाहन
- दीक्षाभूमी परिसरात मुक्काम करण्यास मज्जाव
- खाद्यान्न वाटप स्टॉल, मोफत अन्नदान प्रतिबंधित
- ओळखपत्राशिवाय कोणालाच परवानगी नाही
- पुस्तक, मूर्तीचे स्टॉल लावले जाणार नाही
- लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी
शक्यतोवर गर्दी करू नका
७ ऑक्टोबरपासून दीक्षाभूमी येथील स्तुपात बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन सुरू झाले आहे. काोविड नियमानुसार दर्शन घेता येते. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका.
शक्यतोवर १४ व १५ तारखेला दीक्षाभूमीवर गर्दी करण्याऐवजी आधी किंवा नंतर अभिवादन करा, अशी विनंतीही स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली आहे.