लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्याच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. रिक्त जागांसाठी काही महाविद्यालयांनी गुणवत्तेला डावलून रिक्त जागांवर ‘डोनेशन’च्या माध्यमातून प्रवेश सुरू केले आहे. होतकरू विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधीदेखील न देता थेट पैसे घेऊन व्यवस्थापन कोट्याप्रमाणेच प्रवेश देण्यात येत आहेत.
विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने घेतली. पहिल्या टप्प्यात ‘एमएस्सी’, एमकॉम, एमकॉम (प्रोफेशनल), एलएलएम, एमसीटी, एम.हॉस्प., एमसीएम, एमआयआरपीएम या अभ्यासक्रमांचा समावेश होता. यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या होत्या. विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रवेशफेऱ्या संपल्यानंतर अभ्यासक्रमनिहाय रिक्त जागांवर महाविद्यालये विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देऊ शकतील, असे त्यात सांगण्यात आले होते. दुसऱ्या फेरीअखेर एमएस्सीसह विविध अभ्यासक्रमातील हजारो जागा रिक्त होत्या. यापैकी काही नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी चुरस होती. नियमाप्रमाणे रिक्त जागांवर गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देणे अपेक्षित होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर अर्ज भरण्याची मुदत देऊन प्रवेशयादी लावायला हवी होती. १८ जानेवारी रोजी यादी जाहीर झाली आणि दुसऱ्याच दिवशी बऱ्याच नामांकित महाविद्यालयातील जागांवर प्रवेशदेखील झाले. ही बाब निश्चितपणे नियमानुसार नव्हती, मात्र या महाविद्यालयांवर कुठलीही कारवाई करण्यासाठी पाऊल उचलण्यात आलेले नाही. प्रवेशासाठी अर्ज आणण्यासाठी विद्यार्थी गेले असता त्यांच्या पदरी निराशा पडली.
उद्देशालाच वाटाण्याच्या अक्षता
पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेत काही ठराविक महाविद्यालयांकडून मनमर्जीने प्रवेश देण्यात यायचे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागासोबतच संलग्नित महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत प्रवेश पद्धत सुरू केली होती. मात्र, यंदा महाविद्यालयांनी या उद्देशालाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे.
एमएस्सीसाठी जास्त मागणी
पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात ‘एमएस्सी’च्या एकूण २ हजार १९० जागा आहेत. यापैकी पहिल्या दोन फेऱ्यात १ हजार ५९३ जागांवर प्रवेश झाले व ५९७ जागा रिक्त होत्या. यात नामांकित महाविद्यालयांचादेखील समावेश होता. मात्र रिक्त जागांवर काही तासातच प्रवेश झाल्याचे चित्र आहे.
अशा आहेत पहिल्या टप्प्यातील रिक्त जागा (दुसऱ्या फेरीनंतर)
अभ्यासक्रम- रिक्त जागा
एमकॉम - ९४२
एमकॉम (प्रोफेशनल)- ५८
एलएलएम - ४२३
एमएस्सी- ५९७
एमएस्सी (फॉरेन्सिक) -३
एमसीटी -८
एमसीएम -१,२२६
एम.हॉस्प. - ३१
एम.आय.आर.पी.एम. - ४४