नागपूर : आयुर्वेदिक महाविद्यालयात एका मुलीचा प्रवेश करून देण्याच्या नावाखाली ठकबाजाने ४.७० लाखांचा गंडा घातला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सौरभ संतोष खोब्रागडे (३५, नंदनवन सिमेंट मार्ग) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील एका व्यक्तीच्या मुलीला भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश हवा होता. सौरभला ही गोष्ट कळली व त्याने तेथे प्रवेश करून देतो अशी बतावणी केली. त्याने २७ मे ते २९ जानेवारी या कालावधीत संतोषी फार्मसी, संताजी वसतीगृह, केडीक कॉलेज मार्ग येथे संबंधित व्यक्तीकडून मुलीची मूळ शैक्षणिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे व ४.७० लाख रुपये रोख घेतले. मात्र त्याने प्रवेश करूनच दिला नाही. तक्रारदाराने वारंवार सौरभला विचारणा केली. मात्र प्रत्येकवेळी तो काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचा. त्याची चौकशी केली असता अशा पद्धतीने प्रवेश होत नसल्याची बाब समोर आली. संबंधित व्यक्तीने सौरभला पैसे परत मागितले. मात्र त्याने ते परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात सौरभविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. त्याने अशा प्रकारे आणखी लोकांनादेखील गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तो हाती लागल्यावरच आणखी खुलासा होऊ शकणार आहे.