नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक निरंजन सुधांशू यांनी सांगितले. वनामती सभागृहात आयोजित महसूल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यावेळी उपस्थित होते.
जमिनीच्या नोंदी, अभिलेख अचूक ठेवणे हे महसूल विभागाचे महत्त्वाचे काम आहे. इतर कामांमुळे याकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे सुधांशू यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी केले. संचालन सामान्य प्रशासन उपायुक्त आशा पठाण यांनी केले
जमिनीच्या मोजणीसाठी लवकरच रोव्हर मशीनचा वापर
. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामामध्ये अनेक चांगले बदल होत आहेत. लवकरच जमिनीच्या मोजणीसाठी रोव्हर मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत होणारी जमीन मोजणी अवघ्या काही मिनिटात पूर्ण करणे शक्य होईल. पीक कर्ज अथवा इतर कर्जासाठी आवश्यक महसूल विभागाशी संबंधित अभिलेख बँकांना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे सुधांशू यांनी सांगितले.
कोविडमध्ये महसूल विभागाचे काम उत्तम
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. कोविडसारख्या असाधारण परिस्थितीमध्येही या विभागाने चांगले काम केले, असे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या या विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी, तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर, जमीन महसूलविषयक कायदे आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार असून त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.