पेट्रोल पंपावर धाड : डिझेलमध्ये भेसळ करताना सापडले चोर नागपूर : भंडारा मार्गावरील एका पेट्रोल पंपावर पोलिसांनी धाड टाकून पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला. पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकासह चार आरोपींना पकडले असून मालकाचा शोध घेतला जात आहे. राजेश पाटील (४२), संगीत वाघमारे (५०), भालचंद्र टेंभरे (३४) आणि राजू परिहार (३६) अशी आरोपींची नावे आहेत. पाचपावली येथील रहिवासी असलेले जगिंदर पाल हरमिंदर सिंग ब्रिज यांचे भंडारा रोडवर कापसी येथे पाल आॅटोमोबाईल नावाचा पेट्रोल पंप आहे. हा पंप इंडियन आॅईल कंपनीचा आहे. झोन ३ चे डीसीपी अभिनाश कुमार यांना या पंपावर भेसळयुक्त पेट्रोल व डिझेल विकले जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलीस गेल्या काही दिवसांपासून या पंपावर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी रात्री उशिरा सॉल्व्हंटचे दोन ट्रक तिथे पोहोचले. पंपाच्या भूमिगत डिझेल टाकीमध्ये सॉल्व्हंट भेसळ केले जात होते. याची माहिती मिळताच अभिनाश कुमार यांनी कळमना पोलिसांसह धाड टाकली. पोलिसांना आरोपी डिझेलमध्ये भेसळ करीत असताना रंगेहात सापडले. सूत्रानुसार एका टँकरमध्ये ८५०० लिटर सॉल्व्हंट आणि दुसऱ्यात ८ हजार लिटर भेसळयुक्त डिझेल आढळून आले. पोलिसांनी दोन्ही टँकर जप्त केले. भूमिगत टाकीमध्ये ९ हजार लिटर डिझेल होते. त्याची क्षमता १२ हजार लिटर आहे. त्यात ३ हजार लिटर सॉल्व्हंट भेसळ केले जात होते. पोलिसांसोबतच इंडियन आॅईल कंपनीची एक चमूही घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नमुने गोळा केले. ते नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात येईल. सूत्रानुसार ९ हजार लिटर डिझेलमध्ये ३ हजार लिटर सॉल्व्हंट मिसळविले जाते. सॉल्व्हंट आणि डिझेलच्या किमतीत २५ ते ३० रुपयांचा फरक आहे. १२ हजार लिटर क्षमतेचा डिझेल टँक तीन ते चार दिवसात खाली होतो. अशाप्रकारे भेसळयुक्त पेट्रोल-डिझलेची विक्री करणारे दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करतात. उत्तर प्रदेशात जात होते साल्वंट सूत्रांनुसार जप्त करण्यात आलेले साल्वंट ओरिसातील संभलपूर येथून उत्तर प्रदेशात जात होते. रासायनिक उद्योगात साल्वंटचा उपयोग केला जातो. खरेदीदाराशी संगनमत असल्याने साल्वंट उद्योगांच्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी पेट्रोल पंपावर पोहोचते. अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. पेट्रोलियन कंपनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा याची माहिती असल्याचे सांगितले जाते.
भेसळखोरांचा भंडाफोड
By admin | Published: July 20, 2015 3:08 AM