कमल शर्मा
नागपूर : औष्णिक वीज केंद्रांना स्वच्छ कोळसा पुरविण्याचा दावा करणाऱ्या कोल वॉशरीजच्या भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर गेली असून दुसरीकडे संपूर्ण यंत्रणा त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. वजन वाढविण्यासाठी धुतलेल्या कोळशात लोखंडाचा चुरा मिसळला जात असल्याचे धक्कादायक वास्तव व्हीएनआयटीच्या तपासात समाेर आले हाेते. महाजेनकाेनेच हा खुलासा केला हाेता. राज्य खाण महामंडळ (एमएसएमसी) मात्र या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतेय.
काेल वाॅशरीजबाबत आलेल्या तक्रारींच्या आधारावर महाजेनकाेने काेराडी वीज केंद्राला पाठविलेल्या धुतलेल्या काेळशाची तपासणी व्हीएनआयटीकडून केली हाेती. त्यानुसार रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चरच्या काेल वाॅशरीजमधून आलेला धुतलेला काेळसा लाेहमिश्रित असल्याचे व्हीएनआयटीच्या तपासातून निष्पन्न झाले हाेते. अधिक बिल काढण्यासाठी स्वच्छ काेळशात आसपासची लाेहयुक्त माती मिसळवून वजन वाढविण्यात येत असल्याचेच दिसून येते. यातून सरकारचा महसूल माेठ्या प्रमाणात लुटण्याचा खेळ सुरू आहे.
महाजेनकाेच्या पत्रात गंभीर तथ्य
महाजेनकोने १३ मार्च २०२४ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार धुतलेल्या कोळशाचा निकृष्ट दर्जा, लोहखनिज आणि लोखंड उद्योगातील कचरा मिसळण्याच्या तक्रारीवरून चौकशी केली. त्यात लोखंड आढळून आले.
खात्रीसाठी कंपनीने व्हीएनआयटीशी संपर्क साधून तांत्रिक तपास केला. चाैकशीत धुतलेल्या कोळशात लाेह मिसळल्याची पुष्टी झाली.
युक्तिवाद आणि वास्तव
तर्क : कोळशापेक्षा लोखंडाचे मूल्य अधिक असल्याने महागड्या वस्तूंची भेसळ का होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वास्तव : आसपासच्या परिसरातील माती लाेहमिश्रित आहे. त्यामुळे लाेखंड नाही, माती मिसळली जाते.
तर्क : कोल वॉशरीमध्ये बऱ्याच दिवसांपासून महाजेनकोचे तीन अभियंते आहेत. ते वॉशरी आणि साइडिंगमध्येदेखील राहतात. महाजेनको आणि एमएसएमसीचे अधिकारीही तपासणी करतात. त्यांना भेसळ का दिसली नाही?
वास्तव : महाजेनकोची चाैकशी आणि व्हीएनआयटीचा अहवालातून अभियंता
आणि अधिकाऱ्यांचे साटेलाेटे असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.