लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले परिणामदेखील दिसायला लागले आहे. या कालावधीत दळणवळण यंत्रणा, उद्योग बंद होते व त्यामुळे वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटल्याचे आढळून आले. विशेषत: देशातील उत्तर, मध्य व दक्षिण भारतात यामुळे प्रदूषणात घट झाल्याची बाब समोर आली आहे. ‘व्हीएनआयटी’तील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) संशोधनातून ‘लॉकडाऊन’ काळात वातावरणातील प्रभावाची आकडेवारी दिसून आली.‘व्हीएनआयटी’तील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रोफेसर डॉ.यशवंत काटपातळ, ‘एमटेक’चे विद्यार्थी विकास पटेल व प्रकाश टाकसाळ यांनी हे संशोधन केले. ‘नासा’च्या तीन उपग्रहांकडून मिळालेल्या ‘डाटा’च्या आधारावर वातावरणातील ‘एरोसोल’ची खोली व प्रमाण यांचा अभ्यास केला. २०१६ ते २०१९ या वर्षांत २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण जास्त होते. यंदा हे प्रमाण फारच कमी होते. जेव्हा वातावरणात ‘एओडी’ (एरोसोल आॅप्टिकल डेप्थ) कमी असते तेव्हा ‘एरोसोल’चे प्रमाणदेखील घटलेले दिसून येते. संशोधकांनी या कालावधीतील ‘एओडी’ व ‘एआय’ (एरोसोल इंडेक्स) दोघांचीही तुलना केली.‘लॉकडाऊन’च्या कालावधीत राजस्थान, उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत व मध्य भारतात ‘एओडी’चे प्रमाण कमी होते. मात्र पश्चिम भारतात फारसा फरक आढळून आला नाही. प्रदूषित भागातील एरोसोलचे प्रमाण पहिल्यांदा असे कमी झाल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. दुसरीकडे ‘एआय’चा संबंध हा थेट वायूप्रदूषणासोबत असतो. उत्तर भारत व मध्य भारतात ‘एआय’चे प्रमाण कमी होते. मानवनिर्मित हस्तक्षेप कमी असल्यास एरोसोलच्या प्रमाणात अशी घट राहू शकते, असा निष्कर्ष यातून समोर असल्याचे संशोधकांनी सांगितले.‘एरोसोल’ म्हणजे काय ?वायुप्रदूषणाशी ‘एरोसोल’चा संबंध असतो. यात लहान थेंब, धुळीचे लहान कण, ब्लॅक कार्बनचे सूक्ष्म कण, वायुप्रदूषण करणारे वायू इत्यादींचा समावेश असतो. ‘एरोसोल’ हे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. धुके, गिझर स्टीम, ज्वालामुखीय धूळ ही नैसर्गिक ‘एरोसोल’ची उदाहरणे आहेत तर धुके, धूळ, वायु प्रदूषण करणारे कण, धूर हे मानवनिर्मित असतात. ‘एरोसोल’चे ‘एआय’ किंवा ‘एओडी’चे प्रमाण वाढले तर प्रदूषणात वाढ होते.
‘लॉकडाऊन’चा फायदा, वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 9:04 PM
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले परिणामदेखील दिसायला लागले आहे. या कालावधीत दळणवळण यंत्रणा, उद्योग बंद होते व त्यामुळे वातावरणातील ‘एरोसोल’चे प्रमाण घटल्याचे आढळून आले.
ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’तील प्राध्यापकांचे संशोधन : देशभरातील प्रदूषणात घट