नागपूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, त्यावर बंधारे बांधल्यास त्याचा विपरीत परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होईल. ही वस्तुस्थिती तत्काळ कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. त्यांनी ऐकले तर ठीक अन्यथा सर्वोच्च न्यायालयात ही वस्तुस्थिती मांडण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.यासंदर्भात सिमुलेशन मॉडेल तयार करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे बंधाऱ्यांची उंची वाढली तर त्याचा परिणाम किती होईल, किती क्षेत्र पाण्याखाली जाईल, हे कळण्यास मदत होणार आहे. हा अभ्यास पूर्ण होईपर्यंत कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, अशी विनंती केली जाईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सादर केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. सध्या वातावरण बदलामुळे दीड-दोन महिन्यांतील पाऊस केवळ पाच-सात दिवसांत पडतो. मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहून जाते. नवीन बंधारे तयार करून हे पुराचे पाणी दुष्काळी भागात नेता येईल का, याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या संचालक यांच्यासोबत यासंदर्भात सकारात्मक बैठक झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा २ मध्ये ४२ गावांना पाणी मिळणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. विक्रम सावंत, राहुल कूल यांनी चर्चेत सहभाग घेतला.
अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास कोल्हापूर-सांगली जिल्ह्यावर विपरीत परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 11:37 AM