नरेश डोंगरे
नागपूर : माफीचा साक्षीदार बनविणे म्हणजे एकप्रकारे त्या गुन्ह्यातून त्या आरोपीची मुक्तता करणे होय. त्यामुळे त्या गुन्ह्यात आरोपीची भूमिका नेमकी कशी आणि किती आहे, हे लक्षात घेऊन नंतरच संबंधित आरोपीला माफीचा साक्षीदार करायचा की नाही, हे न्यायालय ठरविते. एखादा मुख्य आरोपीच माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करीत असेल, तर त्याला त्या गुन्ह्यातून माफी मिळणे दुरापास्त आहे, असे मत राज्याचे सुप्रसिद्ध विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले.
अँटिलिया बॉम्ब प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला (अंमलबजावणी संचालनालय) पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नोंदविलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासंबंधाने ‘लोकमत’ने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली असता, हा स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.
ते म्हणाले, एखाद्या गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करावा की करू नये, हा सर्वस्वी अभियोजन पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करतो, त्या अर्जावर न्यायालय सरकारी पक्षाचे मत मागवू शकते. सरकारी पक्षाला वाटलं की, त्या आरोपीचा त्या गुन्ह्यात सहभाग अत्यंत कमी आहे, त्याला माफी दिल्याने गुन्ह्याचे कट-कारस्थान, तसेच कट करणारे उघड होऊ शकतात, गुन्ह्यातील अन्य प्रमुख आरोपींना शिक्षा होण्यास त्याची मदत होऊ शकते, असा विश्वास निर्माण झाला, तरच सरकारी पक्ष न्यायालयात तसे मत मांडू शकतो. न्यायालयाला आरोपीची विनंती मान्य करावी, असे लेखी स्वरूपात कळवू शकतो.
त्यानंतरही न्यायालयाला अनेक बाबी तपासाव्या लागतात, असे स्पष्ट करताना ॲड. निकम म्हणाले, माफीचा साक्षीदार ज्याला बनवायचे, त्याचा गुन्ह्यात सहभाग किरकोळ स्वरूपाचा आहे, असे पटले, तरच न्यायालय त्याला माफीचा साक्षीदार बनवू शकते. कारण माफीचा साक्षीदार होणे म्हणजे त्या गुन्ह्यातून त्या आरोपीची एकप्रकारे निर्दोष मुक्तता होण्यासारखेच आहे. सचिन वाझेने ज्या प्रकरणात माफीचा साक्षीदार करून घेण्यासाठी विनंती करणारा अर्ज केला, त्या प्रकरणात तो प्रमुख आरोपी असल्यासारखा आहे. कारण अवैधपणे रक्कम वसूल (गोळा) करणे, हा मोठा गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर, वाझेने माफीचा साक्षीदार बनण्यासाठी अर्ज करण्याचा प्रकार म्हणजे स्वत:ची कातडी वाचविण्यासारखा आहे. त्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार बनविणे अर्थात गुन्ह्यातून माफी देणे शक्य नसल्याचे ॲड. निकम म्हणाले.
हे आहेत धोके...
एखादा सराईत गुन्हेगार माफीचा साक्षीदार बनला, तर त्याचा हेतू सदोष असू शकतो. तो इतरांची नावे घेऊन त्यांना खोट्या रितीने गुन्ह्यात अडकवू शकतो. त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणालाच वेगळी कलाटणी मिळू शकते. माफीच्या साक्षीदाराचे हे धोके आहेत, ते लक्षात घेऊनच न्यायालय माफीचा साक्षीदार बनवायचा की नाही, त्याबाबत निर्णय घेते.