वकिलांची भरमसाट फी न्यायदानातील अडथळा : सरन्यायाधीश शरद बोबडे यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:09 PM2019-12-14T22:09:39+5:302019-12-14T22:11:45+5:30
वकिलांची भरमसाट फी न्यायदानात अडथळा ठरत आहे. ही न्यायव्यवस्थेतील गंभीर त्रुटी आहे. तिने न्यायापर्यंत पोहचण्याचा मार्ग बंद केला आहे अशी खंत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वकिलांची भरमसाट फी न्यायदानात अडथळा ठरत आहे. ही न्यायव्यवस्थेतील गंभीर त्रुटी आहे. तिने न्यायापर्यंत पोहचण्याचा मार्ग बंद केला आहे अशी खंत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली.
नागपूरचे सुपुत्र असलेले शरद बोबडे यांचा शनिवारी माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम हायकोर्ट परिसरात पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेकांनी वकिलांच्या वाढलेल्या फीसंदर्भात प्रश्न विचारले. ही खरोखर चिंताजनक बाब असून यामुळे न्यायदान महाग झाले आहे. परंतु, या विषयावर न्यायालय काहीच करू शकत नाही. वकिलांनी स्वत:च आपला इतिहास आठवून आवश्यक निर्णय घ्यायला हवा. सध्या ही परिस्थिती कशी बदलेल हे सांगता येणार नाही असे बोबडे म्हणाले.
मध्यस्थी प्रक्रियेचा उपयोग करून आपसी तडजोडीने वाद मिटविणे ही पक्षकारांच्या फायद्याचे आहे. आर्थिक उत्पन्न कमी होण्याच्या भितीमुळे वकील या पर्यायी न्यायव्यवस्थेला विरोध करतात. परंतु, ही प्रक्रिया वकिलांसाठी नुकसानकारक असल्याचे मुळीच वाटत नाही. सध्या मध्यस्थीवर कोणत्याही विद्यापीठात अभ्यासक्रम शिकविला जात नाही. मध्यस्थीला प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. त्यामुळे नागपूर व मुंबई विधी विद्यापीठाला मध्यस्थीवर अभ्यासक्रम सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे अशी माहिती बोबडे यांनी दिली.
न्यायव्यवस्था न्यायाधीश व वकील या दोघांमुळेही बळकट व प्रभावी होते. त्यामुळे दोघांमध्ये एकमेकांविषयी आदर व सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. चांगले न्यायाधीश तयार होण्यासाठी आधी चांगले वकील घडले पाहिजे. वकिली यांत्रिकी नसावी. ती रचनात्मक असायला हवी. न्यायव्यवस्थेतील व्यक्तींचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ असणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता वकिलांच्या संघटनांनी पुढाकार घेऊन आरोग्यविषयक उपक्रम राबवावे असे आवाहन बोबडे यांनी केले.
अयोध्यासारख्या प्रकरणांत हवे आर्टिफिशियल इन्टेलिजन्स
न्यायव्यवस्थेमध्ये आर्टिफिशियल इन्टेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करणे काळाची गरज झाली आहे. अयोध्या प्रकरणात हजारो पानांचे पुरावे, माहिती व संदर्भ होते. अशा प्रकरणांत या तंत्रज्ञानाचा न्यायालयाला खूप उपयोग होऊ शकतो. हे तंत्रज्ञान एक सेकंदात १० लाख शब्द वाचते. त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा उपयोग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे बोबडे यांनी सांगितले.
नागपूरमुळे सरन्यायाधीश होऊ शकलो
नागपूर माझे घर आहे. येथे माझी मुळे खोलवर रुजली आहेत. नागपूरने मला जीवन व कायद्यातील महत्वाचे धडे दिले. कौशल्य, मार्गदर्शन, अनुभव, आत्मविश्वास, ज्ञान नागपूरमधूनच मिळाले. त्यामुळे सरन्यायाधीश होऊ शकलो अशा भावणा बोबडे यांनी व्यक्त केल्या. नागपुरची वकिली परंपरा महान असून अशी परंपंरा देशात फार कमी आहे. त्यामुळे हा सत्कार आत्मिक समाधान देणारा आहे असेही ते म्हणाले.