वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडेट’ असावे : वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:38 AM2018-09-30T01:38:14+5:302018-09-30T01:41:40+5:30
प्रत्येक खटला हा वेगळा असतो. त्यामुळे त्याचे दस्तऐवज आणि युक्तिवाद प्रकरणनिहाय वेगवेगळे असतात. तेव्हा वकिलांना खटलेनिहाय मुद्दे, कायदा, सोबतच उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्णयाची माहिती असावी. एकूणच वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडेट’ असावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक खटला हा वेगळा असतो. त्यामुळे त्याचे दस्तऐवज आणि युक्तिवाद प्रकरणनिहाय वेगवेगळे असतात. तेव्हा वकिलांना खटलेनिहाय मुद्दे, कायदा, सोबतच उच्च व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्णयाची माहिती असावी. एकूणच वकिलांनी कायद्याबाबत ‘अपडेट’ असावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता शेखर नाफडे यांनी येथे व्यक्त केले.
नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने वकिलांसाठी वाचनकक्ष तयार केले आहे. या कक्षाचे उद्घाटन नाफडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी हायकोर्ट बार स्टडी सर्कल कमिटीतर्फे त्यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ‘दिवाणी, मूलभूत हक्क, निवडणूक आणि साक्ष नोंदणी आदी प्रकरणे आणि युक्तिवाद’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला अॅड. किलोर यांनी नाफडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी अॅड. नाफडे म्हणाले, अनेकदा वकिलांना कायद्यााची माहिती नसते व तशा प्रकरणात प्रत्येक न्यायालय वेगवेगळा निकाल देते. अशावेळी वकिलांनी सक्रिय असायला हवे . यावेळी त्यांनी काही खटल्यांची उदाहरणेही दिली. मुंबई बॉम्बस्फोटातील एका खटल्याचा त्यांनी उल्लेख केला. यात सरकारची बाजू मांडताना त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली आणि त्याचा निकाल नंतर सरकारच्या बाजूने कसा लागला, हेही समजावून सांगितले.
प्रास्ताविक हायकोर्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. संचालन अॅड. प्रीती राणे यांनी केले.सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.
वकिलांसाठी अवांतर वाचनासाठी पुढाकार
कायद्याच्या पुस्तकांसोबतच अवांतर वाचनही वकिलांना अनेकदा मदतीचेच ठरते. त्यामुळे त्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने वाचन कक्ष तयार करण्यात आला आहे. यात कायद्याच्या पुस्तकाव्यतिरिक्त कथा कादंबरी, आरोग्य, खेळ, महापुरुषांसह अनेक मान्यवरांचे आत्मचरित्र अशी तब्बल ५०० पुस्तके आहेत. याला न्यायमूर्ती व्हिावियन बोस रिडींग कॉर्नर असे नाव देण्यात आले.